'मी कबड्डीचा खेळाडू, प्यादा नाही'; भुजबळांच्या वक्तव्यावर तटकरेंची प्रतिक्रिया

'मी कबड्डीचा खेळाडू, प्यादा नाही'; भुजबळांच्या वक्तव्यावर तटकरेंची प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेवरती संधी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली खदखद बोलून दाखवली. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांच्या मुलांना राज्यसभेत संधी दिली जाते. तसे माझ्या पुतण्याला मंत्रिपद द्या मी राज्यसभेवर जातो, अशी माझी मागणी होती. मात्र, तसे झाले नाही या शब्दात ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांचं देखील नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज्यसभेवरती खासदार प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.

जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भुजबळ हे विधान भवनात सोमवारी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भावना व्यक्त केली. भुजबळ म्हणाले, "सुनेत्रा पवार, तटकरे आणि इतरांची मुलं राज्यसभेवर आणि इकडे मंत्री आहेत. मीसुद्धा हा पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती. पण हे चालायचंच, मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा खेळाडू नाही. त्यावर सुनील तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया देत भुजबळ माझ्याबद्दल असे बोलले असतील असे मी मानत नाही असं म्हणालेत.

माध्यमांशी बोलताना भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले, "ते कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, ते बुद्धिबळही चांगले खेळतात. ती भुजबळांची बोलण्याची शैली आहे. ते माझ्याबद्दल असे बोलले असतील असे मी मानत नाही. माझा राजकीय प्रवास आणि कारकीर्द त्यांना चांगली माहिती आहे. त्यांचा मान मोठा आहे. त्यांना अभिप्रेत गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत आणि पुढेही घडतील असंही तटकरे म्हणालेत."

त्याचबरोबर ते लोकसभेला वगैरे बोललेत राज्यसभेला बोललेत. ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही.ते जे बोललेत ते बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. मी लोकांच्यातून निवडून आलो आहे, मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेची निवडणूक सुद्धा निवडणूक होती, ती बिनविरोध झाली हा भाग वेगळा. त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल वाटत नाही माझे त्यांचे गेल्या ३५ ते ४० वर्षांचे स्वहार्धाचे संबंध आहेत, साहेबांचा मुळताच आक्रमक स्वभाव हा अनेक वर्षांमध्ये अनेकांनी महाराष्ट्रामध्ये पाहिलेला आहे, पण आजच वक्तव्य त्यांचं आक्रमकतेच द्योतक नव्हतं, त्यांनी त्यांची एक पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला असावा,असंही तटकरेंनी म्हटलं आहे.