धाराशिवमध्ये महायुतीतच राडा! तानाजी सावंत आणि राहुल मोटे समर्थक आमनेसामने; 10 गाड्यांची तोडफोड
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवरील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तथा शिवसेना नेते तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्या समर्थकांमध्ये सोमवारी मध्यरात्री जोरदार राडा झाला. तेरखेडा येथे दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली असून इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थारसह सुमारे 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसने तानाजी सावंत गटावर हल्ल्याचा आरोप केला आहे. तर सावंत गटाने हे आरोप फेटाळत, पराभवाचा राग काढण्यासाठी मुद्दाम वातावरण तापवल्याचा दावा केला. तसेच काही वाहनांची तोडफोड करून आमच्यावरच आरोप केल्याचाही आरोप सावंत समर्थकांनी केला आहे.
या घटनेप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार न दिल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. 45 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.




