त्रिशा कृष्णनवरील वक्तव्यावरून उदयनिधी स्टॅलिन अडचणीत; हायकोर्टाचा मोठा दिलासा

त्रिशा कृष्णनवरील वक्तव्यावरून उदयनिधी स्टॅलिन अडचणीत; हायकोर्टाचा मोठा दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांना अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घडामोडीनंतर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश देत, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.

कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्यावर टीका केली. यावेळी जमावातून अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचे नाव घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या कथित द्विअर्थी वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की,उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्याचा किंवा न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा कोणताही विचार नाही. एका महिलेच्या सन्मानाशी संबंधित प्रकरण असल्यामुळे केवळ कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांची चौकशी केली जात आहे.

सरकारी पक्षाने न्यायालयाला हेही सांगितले की, ही घटना तंजावूर जिल्ह्यात घडल्याने त्याच ठिकाणी चौकशी सुरू आहे. यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना चौकशी करण्याची परवानगी दिली, मात्र चौकशी पूर्ण होताच त्यांना सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

दरम्यान, तंजावूरमधील आंदोलनादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी "पाणी इतर कुठे पोहोचो अथवा न पोहोचो, पण तिथे नक्की पोहोचले पाहिजे, असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी आपण कावेरीच्या पाण्याबद्दल बोलत होतो, असे स्पष्टीकरणही दिले.

या प्रकरणामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.