दिपाली सय्यद यांचा रुपाली चाकणकरांवर आरोप; मेंटली टॉर्चर आणि OTT प्लॅटफॉर्मवर दबाव आणतायत
मुंबई (प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांकडून नुकताच 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि शिंदे सेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिले. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटातील कोणतेही पात्र रुपाली चाकणकर यांचे आहे, असे कुठेही म्हटलेले नाही. तरीही रुपाली चाकणकर हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून OTT प्लॅटफॉर्मच्या स्टेकहोल्डर्सवर दबाव टाकत आहेत, असा आरोप दिपाली सय्यद यांनी केला. मात्र, काहीही झालं तरी चित्रपट प्रदर्शित होणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिपाली सय्यद म्हणाल्या, “आम्ही जो ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपट करत आहोत, त्यामध्ये मी कुठेही म्हटलेलं नाही की या चित्रपटात रुपाली चाकणकरांचा रोल आहे. रुपाली चाकणकर स्वतः तो रोल त्यांचा आहे, असे सांगून आपल्यावर हे सगळं ओढवून घेत आहेत. त्यांना मी आतापर्यंत रिस्पेक्टफुली उत्तर दिलेले आहे.”
“रुपाली चाकणकर यांनी बदनामीचा 25 कोटींचा दावा माझ्यावर केला. आम्ही आता त्यांना नोटीस पाठवली असून 500 कोटींचा दावा त्यांच्यावर टाकला आहे. त्या माझी बदनामी करत आहेत. मी रुपाली चाकणकर यांची काय बदनामी केली, हे त्यांनी सांगावे,” असेही दिपाली सय्यद यांनी म्हटले.रुपाली चाकणकर यांच्याबाबत आपण कोणत्याही अश्लील पोस्ट सोशल मीडियावर टाकलेल्या नाहीत, असा दावाही दिपाली सय्यद यांनी केला. “मी फक्त माझं टीजर पोस्ट केलं. तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना ज्या गोष्टी करायला हव्या होत्या, त्या गोष्टी तुम्ही आता करत आहात. दुसरं टीजर आल्यानंतरच तुम्ही गुन्हा दाखल केला,” असे त्या म्हणाल्या.
“माझा उदरनिर्वाह या चित्रपटावर आहे. मी कलाकार आहे. मला रुपाली चाकणकर मेंटली टॉर्चर करत आहेत,” असा आरोपही दिपाली सय्यद यांनी केला.‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा कोणाचीही बायोग्राफी नसल्याचे सांगत दिपाली सय्यद म्हणाल्या की, या चित्रपटात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक दाखवण्यात आला आहे. कोणतीही चौकशी न करता थेट तक्रार करणे, बदनामीचा दावा करणे आणि गुन्हे दाखल करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.
OTT प्लॅटफॉर्मच्या स्टेकहोल्डर्सवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत दिपाली सय्यद यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत ठाम भूमिका घेतली. “काहीही झालं तरी 2 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.




