जंतर-मंतरवर आंदोलनादरम्यान लाठीचार्ज; चंद्रशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज घटनास्थळी दाखल
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीजेपीच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, काहींना डोक्यालाही दुखापत झाली आहे.

सुमारे 30 ते 35 हजार आंदोलकांनी जंतर-मंतरवरून संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडत संसद पोलीस ठाण्याच्या परिसरापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलीस आणि आरएएफचे मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले असून, मोर्चाला परवानगी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
घटनास्थळी खासदार चंद्रशेखर, महुआ मोईत्रा, अभिनेते प्रकाश राज आणि विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी भेट दिली. तसेच आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि अतिशी यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, सीजेपीच्या मुख्य प्रवक्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी, "संसदेकडे जाणारा मोर्चा शांततापूर्ण असेल आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही," असा दावा केला आहे.
दरम्यान, 23 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी तीन अटी मांडल्या आहेत. शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीप्रकरणी सरकारने जबाबदारी स्वीकारावी, सीजेपीच्या शिष्टमंडळाला संसदेत जाण्याची परवानगी द्यावी आणि हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे, तसेच ते शक्य नसल्यास खासदारांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन तेच आश्वासन द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, सीजेपीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मंडी हाऊस मेट्रो स्टेशनमध्ये आंदोलकांनी "इन्किलाब जिंदाबाद"च्या घोषणा दिल्याचा दावा केला आहे.




