पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदींचा मोठा संदेश; अंतराळ, स्टार्टअप आणि विकासाचा केला उल्लेख

पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदींचा मोठा संदेश; अंतराळ, स्टार्टअप आणि विकासाचा केला उल्लेख

मुंबई (प्रतिनिधी) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आणि संसद सदस्यांना महत्त्वाचा संदेश दिला. यावेळी त्यांनी हे अधिवेशन देशासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगत, सकारात्मक चर्चा आणि फलदायी कामकाजाची अपेक्षा व्यक्त केली.

पंतप्रधान म्हणाले की,"जिथे तथ्य आणि तर्क असतात, तिथे गोंधळाला स्थान नसते. संसदेत अनुभवी खासदार आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीसाठी उपयोग झाला पाहिजे. देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संसदेचे कामकाज सुरळीत आणि अर्थपूर्ण होणे गरजेचे आहे."

यावेळी त्यांनी पावसाळ्याची उपमा देत,"पाऊस आणि पावसाळी अधिवेशन दोन्हीही प्रॉडक्टिव्ह असतील, तर त्याचा फायदा संपूर्ण देशाला होतो," असेही सांगितले.गेल्या काही आठवड्यांत भारताने अंतराळ, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवलेल्या यशाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. भारतीय तरुणांची क्षमता आता अंतराळाइतकी विशाल असल्याचे सांगत त्यांनी नवकल्पनांचे कौतुक केले.

तसेच राजस्थानमधील नव्या ऑइल रिफायनरीचे उद्घाटन, देशातील तिसऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे लोकार्पण आणि ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनचा उल्लेख करत भारत वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मांडणार असून, विरोधकांकडून NEET-UG पेपर लीक आणि अयोध्या राम मंदिर देणगी गैरव्यवहारासारखे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांमधील जोरदार चर्चांमुळे गाजण्याची चिन्हे आहेत.