पुण्यात मोठा दरोडा उधळला! आंतरराज्यीय टोळीच्या 6 सराईत आरोपींना अटक
पुणे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, धारदार हत्यारे आणि तब्बल 14 लाख 87 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई एका चोरीच्या बोलेरोमुळे उघडकीस आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा येथून चोरीला गेलेली बोलेरो ओतूरमध्ये आढळल्यानंतर वाहनाच्या मालकाच्या नातेवाईकांनी संशयितांना जाब विचारला. यावेळी वाद झाल्यानंतर "चोर-चोर" असा आरडाओरडा होताच गावकरी घटनास्थळी धावून आले. झटापटीत दोन आरोपींना पकडण्यात आले, तर उर्वरित चार आरोपी पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. आलमे, बल्लाळवाडी आणि कोळवाडी परिसरात रात्रभर शोध घेत अखेर सर्व चार फरार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपी महाराष्ट्र आणि तेलंगणामधील दरोडे, दरोड्याचे प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीसह 20 गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले. तसेच त्यांच्यावर विविध राज्यांमध्ये 50 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.सध्या सर्व सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून या टोळीच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे.




