बुटात लपवून बाहेर नेली प्रश्नपत्रिका, 8 हजारांसाठी 6 लाख उमेदवारांचे भविष्य धोक्यात

बुटात लपवून बाहेर नेली प्रश्नपत्रिका, 8 हजारांसाठी 6 लाख उमेदवारांचे भविष्य धोक्यात

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र TET-2026 पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांच्या तपासातून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तब्बल सहा लाख शिक्षक उमेदवारांचे भविष्य ठरवणारी प्रश्नपत्रिका अत्याधुनिक हॅकिंगने नव्हे, तर चक्क बुटाच्या मदतीने छापखान्यातून बाहेर काढण्यात आली. या कामासाठी संबंधित कर्मचाऱ्याला अवघे 8 हजार रुपये आणि भविष्यात प्लॉट देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, TET-2026 परीक्षेसाठी राज्यभरातील सुमारे सहा लाख उमेदवारांची नोंदणी झाली होती. प्रश्नपत्रिकेची छपाई आग्रा येथील एका अत्यंत सुरक्षित छापखान्यात करण्यात येत होती. कडेकोट सुरक्षा, अंगझडती आणि माजी सैनिकांचा पहारा असूनही सुरक्षेतील एका त्रुटीचा फायदा आरोपींनी घेतला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, छापखान्यातील एका कर्मचाऱ्याने प्रश्नपत्रिकेची पाने घडी करून ती बुटाच्या इनसोलखाली लपवली. सुरक्षा रक्षकांनी शरीराची तपासणी केली, मात्र बुटांची तपासणी न केल्याने सलग तीन दिवस प्रश्नपत्रिकेचे संच छापखान्याबाहेर नेण्यात आले.

यानंतर मुख्य सूत्रधाराने ही प्रश्नपत्रिका आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या रकमेत विकल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली नव्हती. संपूर्ण व्यवहार हार्ड कॉपीच्या माध्यमातून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली. ज्या छापखान्यात गोपनीय प्रश्नपत्रिका छापल्या जात होत्या, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेच बंद असल्याने आरोपींच्या हालचालींची कोणतीही नोंद उपलब्ध झाली नाही.

परीक्षेच्या दोन दिवस आधी भिवंडी पोलिसांना या प्रकरणाची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर डमी ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला. शिक्षण विभागाकडून प्रश्नपत्रिका मूळ असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यानंतर विविध राज्यांमध्ये छापे टाकत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणानंतर राज्य सरकारने परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, भविष्यात कॉम्प्युटर आधारित परीक्षा, डिजिटल प्रश्नपत्रिका वितरण आणि अधिक कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याच्या पर्यायांवर विचार सुरू आहे. अवघ्या 8 हजार रुपयांच्या मोबदल्यासाठी लाखो उमेदवारांच्या भवितव्याशी खेळ झाल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.