दिल्ली पोलिसांवर विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचे गंभीर आरोप; अभिजीत दिपके यांचा दावा
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यधिक बळाचा वापर केल्याचे गंभीर आरोप केले.

दिपके यांच्या दाव्यानुसार, संसदेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर अमानुष लाठीमार केला. त्यांनी आरोप केला की, काही अल्पवयीन मुलींसह अनेक विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली, एका मुलीचे कपडे फाडण्यात आले, तिच्या छातीवर पाय देण्यात आला, तसेच दुसऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. संबंधित जखमी विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
दिपके यांनी सांगितले की, आणखी विद्यार्थ्यांना दुखापत होऊ नये म्हणून संसद मार्च मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मते, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करता आला असता; मात्र त्याऐवजी लाठीमार करण्यात आला.
त्यांनी दावा केला की, या कारवाईत सुमारे 150 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेले ट्रक कसे पोहोचले, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या आरोपानुसार, पोलिसांसोबत सिव्हिल ड्रेसमधील काही व्यक्तींनीही आंदोलनकर्त्यांवर हल्ला केला.
याशिवाय, दिपके यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांच्यावरही पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप केला. त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव घेत त्यांच्याकडून गैरवर्तन झाल्याचा दावाही केला. स्वतःवरही लाठीमार झाल्याचे त्यांनी सांगितले.




