विधान परिषद निवडणूक: काँग्रेस उमेदवार लवकरच; दानवेंची आमदारकी धोक्यात?

विधान परिषद निवडणूक: काँग्रेस उमेदवार लवकरच; दानवेंची आमदारकी धोक्यात?

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र याच विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंऐवजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या  नावाची घोषणा करण्यात आल्याने काँग्रेस पक्षात नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसनंही आता उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. 

विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी भूमिका महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली. इंडिया आघाडी म्हणून जेव्हा निर्णय होतात, त्याची एक पद्धत आहे. विधान परिषदेच्या उमेदवारी बद्दल प्रक्रिया झाली नाही. आगामी काळातील भूमिका ठरवणं गरजेचं आहे. चर्चेत खोळंबा झाल्यामुळे, उमेदवारी अर्ज भरण्यापासून आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. आवश्यक विश्लेषण होत राहिलं, सगळी उत्तरं आताच द्यायची गरज नाही, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा होता तसाच पाठिंबा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार असून त्यांची 10 मतं मिळवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंनीच पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची आग्रही भूमिका होती. मात्र मित्र पक्षांना याविषयी अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसनं आळवलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरु झाल्याचं दिसून येत आहे. तसेच काँग्रेसने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केल्यास अंबादास दानवेंना विजयासाठी मोठी कसरत करावी लागू शकते. 

एकमेव जागेसाठी उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात, वादाची ठिणगी पडलेली असताना आता भाजपने विधान परिषद निवडणुकीत सातवा उमेदवार देण्यासाठी कंबर कसली आहे. कालच सहा उमेदवार जाहीर करणार भाजप, अतिरिक्त उमेदवार देण्याबाबत केंद्रीय पक्ष पातळीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीत अंतर्गत वाद सुरू झाला आहे आणि याच वादाचा फायदा उचलण्याच्या तयारीत भाजप आहे.