क्रिकेटच्या मैदानात जॉन अब्राहमची दमदार एन्ट्री! युरोपियन टी-20 लीगमधील 'या' संघाचा बनला सहमालक
मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शाहरुख खान, प्रीती झिंटा यांच्यानंतर आता अभिनेता जॉन अब्राहमनेही क्रिकेटविश्वात मोठी एन्ट्री केली आहे. जॉन युरोपियन टी-20 प्रीमियर लीगमधील रॉटरडॅम डॉकर्स संघाचा सहमालक बनला आहे.26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या युरोपियन टी-20 प्रीमियर लीगच्या पहिल्याच हंगामात रॉटरडॅम डॉकर्स मैदानात उतरणार आहे. या संघाच्या मालकी गटात व्यवस्थापकीय भागीदार मधुकर श्री यांच्यासह माजी दिग्गज क्रिकेटपटू जाँटी रोड्स, फाफ डू प्लेसिस आणि हेनरिक क्लासेन यांचाही समावेश आहे.

या स्पर्धेत रॉटरडॅम, अॅमस्टरडॅम, ग्लासगो, एडिनबर्ग, डब्लिन आणि बेलफास्ट या सहा शहरांचे संघ सहभागी होणार असून एकूण 32 सामने खेळवले जाणार आहेत. आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये क्रिकेटचा प्रसार करण्यासोबतच नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंसोबत खेळण्याची संधी या लीगमधून मिळणार आहे.
या नव्या भूमिकेबद्दल बोलताना जॉन अब्राहम म्हणाला, "क्रिकेटमध्ये लोकांना एकत्र आणण्याची आणि नवीन संधी निर्माण करण्याची ताकद आहे. युरोप ही क्रिकेटच्या वाढीसाठी मोठी संधी असलेली बाजारपेठ आहे. रॉटरडॅम डॉकर्सची दूरदृष्टी आणि महत्त्वाकांक्षा पाहता या प्रवासाचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे.बॉलिवूडमधील आणखी एका स्टारची क्रिकेटमधील एन्ट्री झाल्याने आता युरोपियन टी-20 प्रीमियर लीगकडेही क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष लागलं आहे.




