नाशिक हादरलं! तरुणीची निर्घृण हत्या; काही तासांत संशयित तरुणाचाही मृतदेह आढळला

नाशिक हादरलं! तरुणीची निर्घृण हत्या; काही तासांत संशयित तरुणाचाही मृतदेह आढळला

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्यानंतर काही तासांतच या प्रकरणातील संशयित तरुणाचा मृतदेह जॉगिंग ट्रॅक परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

मृत तरुणी वैष्णवी अनिल आवारे ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असून, ती अवघ्या 15 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आली होती. शुक्रवारी रात्री ती वनसंपदा सोसायटी परिसरातून जात असताना तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला. मात्र शनिवारी पहाटे इंदिरानगरमधील जॉगिंग ट्रॅक परिसरात संशयित तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, हत्येनंतर त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक तपासात ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.