महाराष्ट्रातील 6 शासकीय रुग्णालयांत धर्मशाळा; 49 वर्षांसाठी सरकारी जमीन फक्त ₹1 भाड्याने

महाराष्ट्रातील 6 शासकीय रुग्णालयांत धर्मशाळा; 49 वर्षांसाठी सरकारी जमीन फक्त ₹1 भाड्याने

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सहा प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा आणि विश्रामगृहे उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.यासाठी अहमदाबादस्थित सेवादान आरोग्य फाऊंडेशन या संस्थेची निवड करण्यात आली असून, या प्रकल्पासाठी सरकारी जमीन 49 वर्षांसाठी वार्षिक फक्त 1 रुपया नाममात्र भाड्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालय, पुणे; जे. जे. रुग्णालय, मुंबई; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर; छत्रपती संभाजीनगर; वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ; तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या सहा ठिकाणांना मिळणार आहे.

या धर्मशाळांमध्ये फक्त शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनाच राहण्याची सुविधा दिली जाईल. कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक किंवा खासगी वापर करण्यास परवानगी नसेल.

धर्मशाळांचे बांधकाम, निधी, देखभाल, सुरक्षा, स्वच्छता आणि संचालनाची संपूर्ण जबाबदारी सेवादान आरोग्य फाऊंडेशनवर असेल. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर दोन वर्षांच्या आत प्रकल्प पूर्ण करणे संस्थेसाठी बंधनकारक असेल.या प्रकल्पावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त व्यवस्थापन समिती देखरेख ठेवणार असून, करार संपल्यानंतर धर्मशाळेची इमारत आणि सर्व मालमत्ता कोणताही मोबदला न घेता राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.