आषाढी वारीसाठी पंढरपुरात मोठा निर्णय! 15 दिवस मटण-मास विक्री बंद
पंढरपूर (प्रतिनिधी) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून 29 जुलैपर्यंत म्हणजेच सलग 15 दिवस पंढरपूर शहर आणि परिसरात मांस व मटण विक्रीवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. या पवित्र वातावरणात भाविकांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नव्या आदेशानुसार 15 जुलै ते 29 जुलै या कालावधीत शहरात कुठेही मांस किंवा मटणाची विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, वारीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळानेही विशेष तयारी केली आहे. पंढरपूर आगाराला 5 नव्या 'राजमाता जिजाऊ' बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यांचे लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की, वारीच्या काळात वारकऱ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा देण्यासाठी आणखी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत भाविकांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.




