शिंदेंच्या बंगल्यावर मंत्र्यांची तातडीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल?

शिंदेंच्या बंगल्यावर मंत्र्यांची तातडीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल?

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळी अधिवेशन संपताच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोर आला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यापूर्वी आपल्या नंदनवन निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, राज्यातील रखडलेल्या महामंडळांच्या नियुक्त्या आणि संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी असल्याची चर्चा असून, त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावरून त्यांनी ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करत विरोधकांवर राजकीय संधी साधण्याचा आरोप केला.आता सर्वांचे लक्ष शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणाऱ्या निर्णयांकडे लागले आहे.