सत्ता आल्यावर हिशेब चुकता करू”- राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांचा इशारा, वर्धापन दिनात आक्रमक भाषणं
मुंबई (प्रतिनिधी) : शरद पवार गटाच्या मुंबईतील वर्धापन दिन सोहळ्यात युवा नेत्यांनी सरकार आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका करत आक्रमक भाषणे केली.राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी “एक दिवस आमचं सरकार येईल आणि कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा हिशोब चुकता केला जाईल” असा इशारा देत कार्यकर्त्यांवरील कथित त्रासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात वातावरण अधिकच आक्रमक झाले.

विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर गंभीर आरोप करत आंदोलनांना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याची भावना त्यांनी मांडली.
तर मेहबुब शेख यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांच्या निर्णयांमुळे सामाजिक न्याय आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाल्याचे सांगितले. नव्या पिढीला हा विचार पोहोचवणे गरजेचे असून तसे न झाल्यास भविष्यात सक्षम आणि मोठे नेतृत्व उभे राहणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
संपूर्ण कार्यक्रमात युवा नेत्यांनी पक्षाची विचारधारा, संघटनशक्ती आणि आगामी राजकीय आव्हाने यावर भर देत कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले.




