शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन

शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन

मुंबई - शिल्पकलेच्या विश्वातील भीष्माचार्य, जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या 101 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय शिल्पकलेचे मोठे नुकसान झाले असून कला क्षेत्र पोरके झाले आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 20 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली होती. महापुरुषांना अजरामर करणाऱ्या त्यांच्या हातांचा नुकताच सन्मान झाला होता.

धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे राम सुतार यांचे मूळ गाव. 19 फेब्रुवारी 1925 रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचा जन्म झाला. त्यांनी देश - विदेशात अनेक ऐतिहासिक आणि भव्य शिल्पांची निर्मिती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच जगातील सर्वात उंच पुतळा हे त्यांचे सर्वात भव्य कार्य मानले जाते.

राम सुतार यांच्या कलाकृतींमध्ये भारतीय इतिहास, संस्कृती आणि भावना यांचा अद्वितीय संगम दिसून येतो. त्यांच्या योगदानाची दखल घेत 1999 मध्ये त्यांना पद्मश्री तर 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. मालवण - राजकोट येथील समुद्रकिनाऱ्यालगतचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी आपले पुत्र अनिल सुतार यांच्यासह साकारला. तसेच देशातच नव्हे तर जगभरात महात्मा गांधींच्या असंख्य मूर्ती त्यांनी घडवल्या.

भगवान बुद्ध, महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक महान विभूतींच्या मूर्ती त्यांच्या कलेचा उच्चांक दर्शवतात. काही दिवसांपूर्वी अंदमान येथे उभारण्यात आलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळाही राम सुतार यांच्याच कलाकृतीतून साकार झाला होता. राम सुतार यांचे कार्य आणि वारसा भारतीय शिल्पकलेला कायम प्रेरणा देत राहील.