कृषि पदवीधरांमध्ये शेती व शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची क्षमता-विक्रांत गायकवाड

कृषि पदवीधरांमध्ये शेती व शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची क्षमता-विक्रांत गायकवाड

कोल्हापूर (प्रतिनिधी):आजचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे. अशा काळात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्नांचा आणि देशाच्या अपेक्षांचा विचार करून आपल्या करिअरची दिशा ठरवावी. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी शहरांकडे धाव घेतात; परंतु आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग गावाच्या, शेतकऱ्यांच्या आणि शेती क्षेत्राच्या उन्नतीसाठी केला, तर त्यातून खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकते. शेती आणि शेतकरी सक्षम करण्याची ताकद तुमच्यात आहे. असे प्रतिपादन इचलकरंजी विभाग पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी केले. ते जैनापूर येथील शरद कृषि महाविद्यालय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते. 

  यावेळी श्री. बागणे म्हणाले, शेतकरी हा जगाचा खरा पोशिंदा आहे. तो उन्हातान्हात कष्ट करून सर्वांचे पोट भरतो. मात्र, मान्सूनचा लहरीपणा, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या समस्यांमुळे आज शेतकरी संकटात सापडला आहे.

  तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीत नवकल्पना आणणे गरजेचे आहे. शेती  पूरक व्यवसाय सुरु केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे ‘बळीराजा’ पुन्हा आत्मविश्वासाने उभा राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच कृषी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचे सामर्थ्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

  याप्रसंगी आंतर महाविद्यालयीन, आंतर विद्यापीठ तसेच राज्यस्तरावरील विविध खेळांमध्ये पारितोषिक विजेत्या खेळाडूंचा तसेच शैक्षणिक व इतर सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी तृतीय वर्षातील विद्यार्थी कु.वसीम फकीर व उत्कृष्ट पासिंग विद्यार्थी चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी कु.रिया वडगावकर यांचा सन्मान करण्यात आला. 

स्वागत व प्रास्ताविक प्रा. पूजा भोसले यांनी केले. महाविद्यालयाच्या वार्षिक अहवाल प्राचार्या डॉ. सारिका कोळी यांनी सादर केला. सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. संजय फलके, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. दादासाहेब मगदूम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.