नवे दानवाडात अंथरूणातील सापाला जीवदान: सर्पमित्र सोहेल गवंडी यांचे प्रसंगावधान
हेरवाड: (प्रतिनिधी) : वाढत्या उन्हाळ्याचा तडाखा आता केवळ माणसांनाच नाही,तर मुक्या प्राण्यांनाही बसू लागला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे गारवा शोधण्यासाठी साप मानवी वस्तीकडे वळत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अशीच एक थरारक घटना नवे दानवाड येथे घडली असून, अंथरूणात शिरलेल्या १० फुटी धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने जीवनदान दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,नवे दानवाड येथील किरण अनिल कांबळे यांच्या घरात रात्रीच्या वेळी गारवा शोधत एक मोठा साप शिरला.आश्चर्याची आणि भीतीची गोष्ट म्हणजे हा साप थेट घरातील अंथरूणामध्ये जाऊन बसला होता.१० फुटी लांब साप पाहून कांबळे कुटुंबाची अक्षरशः गाळण उडाली. भीतीपोटी घरातील सर्वांची पळापळ सुरू झाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दत्तवाड येथील प्रसिद्ध सर्पमित्र सोहेल गवंडी यांना पाचारण करण्यात आले.कॉल मिळताच सोहेल गवंडी यांनी काही मिनिटांतच कांबळे यांच्या घरी धाव घेतली.अंथरूणात दबा धरून बसलेल्या त्या १० फुटी धामण सापाला अत्यंत शिताफीने आणि कोणत्याही इजा न पोहचवता पकडले.सापाला पकडल्या नंतर कांबळे कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर सोहेल गवंडी यांनी त्या सापाला सुरक्षितपणे निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सोहेल गवंडी यांनी आजवर अनेक विषारी आणि बिनविषारी सापांना पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. त्यांच्या या धाडसी आणि समाजोपयोगी कार्याचे दत्तवाड,दानवाड आणि हेरवाड परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
उन्हाळा वाढल्याने साप गारव्यासाठी घरांच्या अडगळीत किंवा ओलावा असलेल्या ठिकाणी येतात. अशा वेळी घाबरून न जाता सापाला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा- सोहेल गवंडी (सर्पमित्र)




