१० वी - १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; जाणून घ्या 'हे' मोठे बदल

१० वी - १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; जाणून घ्या 'हे' मोठे बदल

मुंबई - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या घरी दहावी किंवा बारावीचे विद्यार्थी असतील, तर परीक्षा पद्धतीत झालेले दोन मोठे बदल जाणून घेणे आवश्यक आहे. एक निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे, तर दुसरा नियम लक्षात न घेतल्यास संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते.

पहिला निर्णय : पहिल्या पेपरसंदर्भात मोठा बदल -

दहावी - बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये पहिल्या दिवशी हिंदी किंवा मराठीचा पेपर घेतला जातो. मात्र, आता या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. नव्या नियमांनुसार, पहिल्या दिवशी हिंदीच्या जागी सोपा विषय ठेवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी हिंदी हा सोपा विषय मानला जात असला, तरी अनेकांना या विषयामुळे मानसिक तणाव जाणवतो, हे निरीक्षण आढळून आले. परीक्षेची सुरुवातच तणावात झाली तर पुढील पेपरांवर त्याचा परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि परीक्षेची सुरुवात तणावमुक्त व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत पहिल्या दिवशी कोणता विषय असणार हे बोर्डाने स्पष्ट केलेले नाही, मात्र विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच आत्मविश्वास देणारा पेपर असावा, असा हेतू यामागे आहे.

दुसरा निर्णय: उपस्थितीबाबत कडक नियम - 

दुसरीकडे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने उपस्थितीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेतील किमान 75% उपस्थिती अनिवार्य असेल.

जर विद्यार्थ्याची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर त्या विद्यार्थ्याला बोर्ड परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत नियमितपणे हजेरी लावणे आवश्यक आहे.

नवीन शैक्षणिक नियम - 

CBSE ने याशिवाय एक महत्त्वाचा बदल आणला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा देण्यासाठी फक्त त्या एका वर्षाचा अभ्यास पुरेसा राहणार नाही.

दहावीची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याने नववी आणि दहावी दोन्ही वर्ग पूर्णपणे शिकलेले असणे आवश्यक आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी, अकरावी आणि बारावी दोन्ही वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे.

फक्त शेवटच्या वर्षी शाळेत प्रवेश घेऊन बोर्ड परीक्षा देता येणार नाही, हे मंडळाने स्पष्टपणे सांगितले आहे.