टीईटी विरोधात राज्यभरातील शिक्षकांचा 9 नोव्हेंबरला मुक मोर्चा

टीईटी विरोधात राज्यभरातील शिक्षकांचा 9 नोव्हेंबरला मुक मोर्चा

मुंबई - महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी टीईटी परीक्षा आणि 15 मार्च 2024 च्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा पहिला आणि मुख्य टप्पा म्हणून 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांचा मूक मोर्चा राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या सर्व शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव होते.

बैठकीत 24 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीतील जंतर - मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाला मध्यवर्ती संघटनेचा सक्रीय पाठींबाही जाहीर करण्यात आला. संघटनेने यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी होणारा मूक मोर्चा शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी 1 ऑक्टोबर रोजी नागपूर बैठकीत दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला होता. मात्र शासनाने अद्याप टी ई टी विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही व टी ई टी संदर्भात शासनाने शिक्षकांच्या बाजूने कोणतीही भूमिका न घेतल्याने शिक्षक वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी पुन्हा एकत्र येऊन 9 नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य मूक मोर्चाचे आयोजन केले आहे.

मोर्चा आंदोलनात 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा, शिक्षण सेवक पद कायमचे रद्द करण्यात यावे आणि वस्तीशाळा शिक्षकांची सेवा मूळ रुजू दिनांकापासून ग्राह्य धरावी याही मागण्या करण्यात येणार आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या ऑनलाईन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. 1 नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक होणार असून 2 ते 7 नोव्हेंबर दरम्यान सर्व खासदार, आमदार आणि मंत्री यांना निवेदने देण्याची योजना आहे. जिल्हा बैठकांनंतर पत्रकार परिषद घेऊन शिक्षकांच्या मागण्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी सर्व जिल्हाध्यक्षांच्या सहीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देण्यात येईल. त्यानंतर 3 ते 8 नोव्हेंबर दरम्यान सर्व शाळांमधून जनजागृती मोहिमेद्वारे शिक्षकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल.

संघटनेने स्पष्ट केले आहे की या वेळी शिक्षक एकजुटीचे प्रदर्शन करणार असून “अभी नाही तर कधीच नाही” या घोषवाक्याखाली हे आंदोलन पार पडेल. शासनाने दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात राज्यातील विविध शिक्षक संघटना सहभागी होत असून त्यामध्ये शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील), महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, शिक्षक परिषद प्राथमिक व माध्यमिक, केंद्र प्रमुख व पदवीधर शिक्षक संघटना, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना, शिक्षक सेना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भारती, आदर्श शिक्षक समिती, नगर परिषद व महानगरपालिका शिक्षक संघ, बहुजन शिक्षक महासंघ, प्रहार शिक्षक संघटना, कस्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटना, आस शिक्षक संघटना, स्वराज्य शिक्षक संघटना, सहकार शिक्षक संघटना, पंजाबराव देशमुख शिक्षक महासंघ, इब्टा शिक्षक संघटना, एकल शिक्षक सेवा मंच, आदिवासी शिक्षक संघटना, स्वाभिमानी शिक्षक संघटना, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघ प्रोटान, मुंबई शहर व उपनगर माध्यमिक शिक्षक संघ तसेच मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफ मुंबई यांचा समावेश आहे.

या बैठकीस केशवराव जाधव, प्रसाद पाटील, चिंतामण वेखंडे, प्रसाद म्हात्रे, राजेश सुर्वे, सतिश कांबळे, दिगंबर टिपूगडे, साजिद अहमद, सुभाष मस्के, शिवाजी इंगळे, अविनाश भोसले, प्रल्हाद बल्लाळ, भरत मडके, सुरेंद्र गायकवाड आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.