उदगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस ; जयसिंगपूर पोलिसांची धडक कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी) - उदगाव (ता. शिरोळ) येथे बनावट नोटांचे मोठे रॅकेट जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी उघडकीस आणले आहे. बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवरील जनावरांच्या गोट्यामध्ये छापा टाकून पोलिसांनी तब्बल ६८,४०० किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणात तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना या बनावट नोटा प्रकरणाची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर इचलकरंजी व दानोळी परिसरातील काही तरुण यात सहभागी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी इचलकरंजी येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.
जयसिंगपूर उपविभागीय पोलीस तसेच स्थानिक पोलिसांकडून अटक केलेल्या तरुणांची सखोल चौकशी सुरू आहे. शिरोळ तालुक्यात अलीकडेच खुनांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावात आता बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.




