बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’; आंदोलकांची मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
मुंबई - प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये झालेल्या ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ मुळे शहरातील मुख्य महामार्ग बुधवारी पूर्णपणे ठप्प झाले. या आंदोलनामुळे नागपूर-हैद्राबाद आणि नागपूर-जबलपूर महामार्गावरील वाहतूक थांबली, तर अनेक नागरिक १२ तासांपेक्षा जास्त वेळ बसमध्ये अडकले. काहींच्या महत्त्वाच्या मुलाखती आणि विमानसेवाही चुकल्या. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नागपूर खंडपीठाने संध्याकाळी ६ वाजेपर्यंत महामार्ग मोकळा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सरकारने गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि अर्थराज्यमंत्री आशीष जयस्वाल यांना आंदोलकांशी चर्चेसाठी पाठवले; मात्र ते उशिरा पोहोचल्याने आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना अटक करण्याची मागणी केली. शेवटी दोन्ही मंत्र्यांच्या आगमनानंतर बच्चू कडू आणि अन्य शेतकरी नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चेची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करत आंदोलकांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले असून, बच्चू कडू आज मुंबईकडे रवाना होणार आहेत.

या चर्चेत माजी आ. राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, वामनराव चटप, खा. अमर काळे, महादेव जानकर, रवी तुपकर यांसारखे शेतकरी नेते सहभागी झाले. आंदोलकांनी आपलं आंदोलन दडपलं जाण्याची भीती व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांनी चर्चेपूर्वी हमी मागितली. मुख्यमंत्र्यांनी ‘मुंबईत गेल्यानंतरही आंदोलन दडपलं जाणार नाही’ असा शब्द बच्चू कडूंना दिला आहे.
सरकारच्या आश्वासनानंतर बच्चू कडूंनी आंदोलकांशी संवाद साधत सांगितले, “आपल्याकडे एक नाही, तर २५ मागण्या आहेत. त्या मांडण्यासाठी मुंबईला जाणं आवश्यक आहे. चर्चेला जाणं म्हणजे आंदोलन संपलं असा अर्थ नाही. जर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करू. ३१ तारखेला रेल्वे रुळावर बसण्याचाही निर्णय घेऊ,” असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनामुळे नागपूरकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून, वाहतुकीसाठी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. तथापि, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चा शांततेत पार पडावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे.




