"सरकार तुमचं असलं, तरी माईक चालवणारे आमचे"; अनिल परबांच्या डायलॉगने विधान परिषदेत पिकला हशा !
मुंबई: राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. मात्र, याच गदारोळात अनेकदा सभागृहात हलकेफुलके आणि मजेशीर क्षणही पाहायला मिळतात. आज (२ जुलै) विधान परिषदेत अशाच एका मिश्किल संवादाने संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकवला. शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांना मारलेला एक टोमणा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं?
विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्यातील शाळांमध्ये पालकांना विशिष्ट दुकानांमधूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाला मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी तीव्र आक्षेप घेतला.
भाई जगताप म्हणाले, "आम्ही ४५ दिवस आधी पुराव्यांच्या आधारे प्रश्न विचारतो. पण मंत्र्यांकडून 'उत्तर अंशतः खरे आहे' असे संदिग्ध उत्तर मिळते, हे चुकीचे आहे. आम्हाला 'पॉईंटेड' प्रश्न विचारायला सांगणारे सत्ताधारी स्वतः मात्र स्पष्ट उत्तरं देत नाहीत."
राम शिंदेंचा आक्षेप आणि अनिल परबांची फटकेबाजी
या चर्चेदरम्यान भाई जगताप सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते, तर त्यांच्या पुढच्या बाकावर बसलेले अनिल परब हे देखील त्याच वेळी बोलत होते. दोन आमदार एकाच वेळी बोलत असल्याने भाजप आमदार राम शिंदे यांनी आक्षेप घेतला. राम शिंदे म्हणाले, "एकाच वेळी दोन-दोन माईक कसे काय सुरू होतात, हीच माझी मुख्य हरकत आहे."
राम शिंदेंच्या या प्रश्नावर अनिल परब यांनी तात्काळ आपल्या खास शैलीत उत्तर दिले. परब मस्करीत म्हणाले: "सरकार जरी तुमचं असलं, तरी माईक चालवणारे (नियंत्रण करणारे) आमचेच आहेत!" अनिल परबांच्या या हजरजबाबी आणि मिश्किल उत्तरावर सभागृहातील तणाव क्षणात निवाळला आणि विरोधकांसह सत्ताधारी बाकांवरील सदस्यांमध्येही एकच हशा पिकला.




