मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळवून देणार..- मनोज जरांगे पाटील
मुंबई - मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आंतरवली सराटी येथून मोर्चा काढत मुंबईत आमरण उपोषण सुरू केले होते. तब्बल पाच दिवस चाललेल्या या उपोषणानंतर, राज्य सरकारने त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करत त्यावर अधिकृत शासन निर्णय (GR) काढला आहे. सध्या जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल असून, तिथूनच त्यांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गरीब मराठ्यांचे भले होणार असेल, तर उपसमिती काढण्यात काही वावगं नाही. कुणी टोळ्या पाठवो वा आरोप करो, त्याचा काहीही फरक पडत नाही. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळवून देणार हे निश्चित असल्याचंही ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणावरही आपली भूमिका स्पष्ट केली. नवीन शासन आदेशाबाबत निर्माण होणाऱ्या शंका-कुशंका फेटाळून लावत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोणीही संभ्रम निर्माण केला तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि माझा समाजही ठेवणार नाही. उठता - बसता टीव्हीवर बोलणाऱ्यांना मी विचारतो, हे लोक बैठकींना का येत नाहीत?”
काही मंडळी मुद्दाम कुरापती काढून संभ्रम निर्माण करत आहेत, पण मराठा समाज असा संभ्रमात येणार नाही असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. “जे बोंबलत आहेत, त्यांना बोंबलू द्या. मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना मी आरक्षणात आणणार आहे. काही दिवसांत हे स्पष्ट होईल. त्यामुळे समाजाने संभ्रमात पडू नये,” असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.
माझा उद्देश फक्त गरीब मराठ्यांना न्याय देण्याचा आहे. जर उपसमित्या स्थापन करायच्याच असतील, तर दलित मुस्लिम, शेतकरी आणि मायक्रो ओबीसींसाठीही उपसमित्या नेमाव्यात असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.




