पत्नीनेच प्रियकर अन् मैत्रिणीच्या मदतीनं काढला पतीचा काटा

पत्नीनेच प्रियकर अन् मैत्रिणीच्या मदतीनं काढला पतीचा काटा

रायगड - रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात एक धक्कादायक हत्या प्रकरण उघडकीस आलं असून, सोशल मीडियावर सुरू झालेलं प्रेम अखेर रक्तरंजित वळणावर पोहोचलं. केवळ 24 तासांत पोलीसांनी या गुन्ह्याचा छडा लावत तीन संशयितांना अटक केली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, पाबळ, ता. पेण) असे आहे. पोलिस तपासात समोर आले की, त्याची पत्नी दिपाली अशोक निरगुडे (वय 19) हिने आपल्या प्रियकर उमेश सदु महाकाळ (वय 21) आणि मैत्रीण सुप्रिया चौधरी (वय 19) यांच्या मदतीने कृष्णाचा काटा काढला.

दिपाली आणि कृष्णा यांच्यातील वैवाहिक संबंध काही काळापासून तणावपूर्ण होते. याच दरम्यान, सोशल मीडियावर तिची ओळख उमेश महाकाळ या तरुणाशी झाली. इंस्टाग्रामवरील या ओळखीनं पुढं प्रेमाचं रूप घेतलं आणि कृष्णाला संपवण्याचा निर्णय तिने घेतला. त्यासाठी ‘वारगुडे’ नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून कृष्णाशी मैत्रीण असल्याचं भासवण्यात आलं. त्याला जाळ्यात ओढून 10 ऑक्टोबर रोजी नागोठणे एस.टी. स्टँडवर बोलावलं गेलं. तिथून त्याचं अपहरण करून वासगावजवळील जंगलात नेण्यात आलं आणि गळा आवळून हत्या करण्यात आली.

हत्या केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा आणि शरीरावर केमिकल टाकण्यात आलं. तसेच त्याचा मोबाईल फोडून तो पाली रोडवर फेकून दिला. सुरुवातीला कृष्णाच्या बेपत्ताची नोंद झाली होती. मात्र, नागोठणे पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची दिशा बदलली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकानं या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक केली.

पोलीस चौकशीत दिपालीनं पतीकडून मानसिक त्रास होत असल्याचं सांगत गुन्ह्याची कबुली दिली. तिचा प्रियकर उमेश आणि मैत्रीण सुप्रिया हेदेखील या कटात सहभागी होते. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रायगड पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर अपरिचित व्यक्तींशी संवाद साधताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.