गडचिरोलीच्या भामरागडला पुन्हा पुराचा विळखा; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला, रुग्णवाहिकाही अडकली

गडचिरोलीच्या भामरागडला पुन्हा पुराचा विळखा; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला, रुग्णवाहिकाही अडकली

मुंबई (प्रतिनिधी) : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या सरी सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांत कुठे मुसळधार, तर कुठे रिपरिप पाऊस सुरू आहे. काल 23 ऑगस्ट रोजी भामरागड तालुक्यात 61 मिलिमीटर, तर भामरागड मंडळात 73 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसामुळे भामरागडजवळील पर्लकोटा नदीला पूर आला आहे. नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडसह पलीकडील 50 हून अधिक गावांचा संपर्क सध्या तुटला आहे. पूरस्थिती पाहता तालुका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झालं आहे. दक्षिण गडचिरोलीतील नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. या पूरस्थितीचा फटका मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही बसला.

जिमलगट्टा येथील 65 वर्षीय मलय्या पन्हटीवार यांचा हेडरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह घेऊन जात असताना आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव नाल्याचा पूल पुराच्या पाण्याखाली गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रुग्णवाहिका रस्त्यातच अडकली असून, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, भामरागड तालुक्यातही पूरस्थिती गंभीर झाली आहे. पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांना पूर आला आहे. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने यावर्षी दुसऱ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील नदी-नाल्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पुराच्या पाण्यातून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील तिगाव-जांभुरटोला रस्त्यावरील छोटा पूलही अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाला आहे. पुलावर दोन मोठे खड्डे पडले असून, पुलाचा काही भाग खचल्याने लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. पुलाची वेळेवर दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.