रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याचा आरोप; 19 जणांवर गुन्हा दाखल, सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील-ठोंबरे यांचाही समावेश
मुंबई (प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये रुपाली पाटील-ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश आहे.

रुपाली चाकणकर यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकच्या ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची सुमारे 9 वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या तेथे जात होत्या. 18 मार्च 2026 रोजी अशोक खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे माध्यमांतून समजल्यानंतर, त्यांच्यासोबतच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो आणि व्हिडिओ वापरून आपल्यावर असंबंधित आरोप करण्यात आल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे.
20 मार्च 2026 रोजी सोशल मीडिया तपासताना सुमारे 19 फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी संगीता तिवारी, अॅड. अशोक बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री सर्मींदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिद्धान्त, रुपाली पाटील-ठोंबरे, सुषमा अंधारे, योगेश सावंत, दिपाली सय्यद, डॉ. आशा मिरगे आणि मोहसीन शेख यांची नावे तक्रारीत नमूद केली आहेत.
तसेच, संबंधित पोस्टवर मिलिंद मारुती गोरे, सपना नंदकिशोर राऊत आणि इतर अनेकांनी लैंगिक, अश्लील आणि अपमानास्पद कमेंट करून विनयभंग आणि मानहानी केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. पुरावा म्हणून स्क्रीनशॉट आणि सोशल मीडिया पोस्टचे पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.या प्रकारामुळे मानसिक त्रास आणि सामाजिक मानहानी झाल्याचे रुपाली चाकणकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.




