तांदुळवाडीजवळ भीषण अपघात; विहिरीत पिकअप कोसळून 8 जणांचा मृत्यू, जुन्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा जाग्या
मुंबई (प्रतिनिधी) : म्हसवड येथे देवदर्शन करून पंढरपूरकडे परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा रविवारी भीषण अपघात झाला. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत वाहन कोसळल्याने पाच महिला, एका सहा महिन्यांच्या बालकासह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी याच परिसरात जागरण-गोंधळ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या कलाकारांच्या जीपचा अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी मोठी जीवितहानी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.रविवारी पंढरपूर येथील बावचे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक असे 14 जण देवदर्शनासाठी म्हसवड येथे गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. तांदुळवाडीजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुरुवातीला स्थानिकांच्या मदतीने विहिरीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. जखमी आणि मृतांना तातडीने पंढरपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.या बचावकार्यात नीळकंठ चौगुले या तरुणाने विशेष धाडस दाखवले. अपघातस्थळी पोहोचताच त्याने विहिरीत अडकलेल्या आपल्या मावसभाऊला ओळखले आणि कोणतीही पर्वा न करता विहिरीत उडी मारून बचावकार्य सुरू केले. त्याच्या तत्परतेमुळे काही जणांना मदत मिळाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, याच ठिकाणी यापूर्वीही गंभीर अपघात घडून जीवितहानी झाल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या भागात संरक्षण भिंत, इशारा फलक तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.




