E20 इंधनावरून केजरीवालांचा केंद्रावर हल्लाबोल; पीएम निवासस्थानाकडे मोर्चा, ट्रम्पच्या दबावाचा आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : E20 इंधनाच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण पुन्हा तापलं आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी E20 इंधनाच्या विरोधात पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत फिरोजशाह रोडवरच तो अडवला.

यानंतर माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली E20 धोरण देशावर लादलं आहे, असा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल म्हणाले, इथेनॉल-मिश्रित इंधनाचा फायदा भारतीय शेतकऱ्यांपेक्षा अमेरिकन शेतकऱ्यांना होणार आहे. या धोरणाविरोधात 2.33 लाख नागरिकांनी आपला विरोध नोंदवला आहे.
ते पुढे म्हणाले की, देशभरात E20 लागू करण्याचा निर्णय हा केवळ केंद्रीय मंत्र्यांचा नसून पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. त्यामुळे सरकारने बाह्य दबावाला बळी न पडता नागरिकांना शुद्ध पेट्रोल उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आप नेते अनुराग धांडा यांनीही सरकारवर टीका करत, देशातील सुमारे 30 कोटी वाहनांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. लोकांच्या भावना सरकारने ऐकायला हव्यात, असं म्हटलं.
शेवटी केजरीवाल यांनी सांगितलं की, आम्ही पंतप्रधानांना भेटण्याची विनंती केली आहे. त्यांनी आम्हाला वेळ द्यावा. मात्र, E20 विरोधातील आमचा संघर्ष पुढेही सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.




