पवार कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे; कोण आहे होणारी सून?
पुणे (प्रतिनिधी) : पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात पार पडणार आहे. नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा पार पडला असून, त्यानंतर आता पवार कुटुंबात आणखी एका शुभकार्याची तयारी सुरू झाली आहे.

रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात धार यांनी एकत्र उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत दोघेही विवाहस्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीची सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.
कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही ती पार्थ पवार यांच्यासोबत विविध सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते. त्यावेळचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
रेवती सुळे आणि उद्योजक सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यातही कायनात धार यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत उपस्थिती दर्शवली होती. त्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्या नात्याची चर्चा अधिकच वाढली होती.
कायनात धार या केवळ आनंदाच्या प्रसंगातच नव्हे, तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्या सोबत दिसल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्या बारामती येथे पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. तसेच मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे त्यांचे पवार कुटुंबाशी असलेले जवळचे संबंध अधोरेखित झाले.
कायनात धार या मूळच्या हरियाणातील असून सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. गेल्या काही काळापासून त्या पार्थ पवार यांच्यासोबत अनेक ठिकाणी दिसल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना दिलेल्या भेटी आणि कौटुंबिक समारंभांमधील त्यांच्या उपस्थितीमुळे त्या सातत्याने चर्चेत राहिल्या. आता 29 जुलै रोजी पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा पार पडणार असल्याने पवार कुटुंबात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजण्याची तयारी सुरू झाली आहे.




