महाराष्ट्रातील या गावात 735 वर्षांपासून बहीण भावाला राखी बांधत नाही; रक्षाबंधन न साजरं करण्यामागचं नेमकं कारण काय?

महाराष्ट्रातील या गावात 735 वर्षांपासून बहीण भावाला राखी बांधत नाही; रक्षाबंधन न साजरं करण्यामागचं नेमकं कारण काय?

मुंबई (प्रतिनिधी) : आज श्रावणी पौर्णिमा.. अर्थात रक्षाबंधन. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा दिवस. आज देशभरात बहिणी आपल्या भावाला राखी बांधून, गोड पदार्थ भरवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात गेल्या 735 वर्षांपासून रक्षाबंधन साजरं केलं जात नाही. या गावातील कोणतीही बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही. यामागचं कारण नक्की काय आहे, जाणून घेऊया..

बुलढाणा जिल्ह्यातील हे वानखेड नावाचं गाव.. जेमतेम दहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पालिवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे. आजपासून तब्बल 735 वर्षांपूर्वी राजस्थानच्या पाली राज्यातून हा समाज व्यवसायानिमित्त या गावात वास्तव्यास आला आणि तेव्हापासून तो याच परिसरात राहतो.सुमारे 735 वर्षांपूर्वी राजस्थानातील पाली राज्यावर दिल्ली सल्तनतीतील जलालुद्दीन खिलजीच्या काळातील शासकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला आणि प्रचंड जीवितहानी झाली. त्यानंतर पाली राज्यातील अनेक नागरिकांनी देशाच्या विविध भागात पलायन केलं. विशेष म्हणजे, हा हल्ला श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी झाल्याचं सांगितलं जातं.

इ.स. 1291 च्या दरम्यान राजस्थानच्या पाली राज्यात मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाज वास्तव्यास होता. शांत आणि वैभवसंपन्न असा हा समाज असल्याने दिल्ली सल्तनतीतील जलालुद्दीन खिलजी आणि त्याच्या सैन्याची या समाजावर नजर पडली आणि पाली राज्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हजारो नागरिकांची हत्या झाल्याचं सांगितलं जातं.या घटनेनंतर पाली राज्यातील पालिवाल ब्राह्मण समाजातील अनेक कुटुंबं व्यवसायानिमित्त देशभरात वेगवेगळ्या भागांत विखुरली. आजही हा समाज विविध व्यवसायांच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करत आहे.

735 वर्षांपूर्वी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी, अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी, आपल्या हजारो पूर्वजांचा मृत्यू झाल्याची आठवण या समाजाच्या मनात आहे. त्यामुळे या समाजाकडून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात नाही.वानखेड गावातील पालिवाल समाजातील लोक दरवर्षी एका मंदिरात एकत्र येतात आणि आपल्या पूर्वजांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करतात. हा दिवस 'एकता दिन' म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी गावातील एकही बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही. घरात गोडधोडही केलं जात नाही. या दिवशीचा दिवस त्या ऐतिहासिक हल्ल्याच्या निषेधाचा दिवस म्हणूनही पाळला जातो.भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. देशभरात आज या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, इतिहासातील एखादी घटना एखाद्या समाजाचं जीवन आणि परंपरा किती बदलू शकते, याचं उदाहरण बुलढाण्यातील वानखेड गावातून पाहायला मिळतं.

जिथे संपूर्ण देशात भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तिथे वानखेडमधील पालिवाल समाज हा दिवस आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करत साजरा करतो. इतिहासातील अनेक घटनांनी समाजाच्या परंपरा आणि जीवनावर कसा प्रभाव पडतो, हे यावरून पुन्हा एकदा दिसून येतं.