शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; आषाढी एकादशीपर्यंत निर्णयाची मागणी

शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; आषाढी एकादशीपर्यंत निर्णयाची मागणी

सोलापूर प्रतिनिधी - राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध अधिक तीव्र होत असून, या विरोधासाठी पश्चिम महाराष्ट्रातील विविध राजकीय नेते एकत्र येत आहेत. शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने आयोजित एल्गार मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला.या मेळाव्यात काँग्रेस नेते सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव मागे घेतल्याची घोषणा करावी, अशी मागणी केली. अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

शेट्टी यांनी सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवरही टीका करत या योजनेचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली. सध्याच्या नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी पुरेशी जमीन उपलब्ध असल्याचा दावा करत त्यांनी नव्या महामार्गाऐवजी पाणी प्रकल्पांवर भर देण्याची गरज व्यक्त केली.यावेळी त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही सरकारवर निशाणा साधला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करत खोटी वृक्षलागवड दाखवून निधीचा गैरवापर झाल्यास संबंधितांकडून व्याजासह रक्कम वसूल करण्याची भूमिका त्यांनी मांडली.राजू शेट्टी यांनी राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचाही उल्लेख करत भाजपवर टीका केली. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही संदर्भ देत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

भाषणाच्या शेवटी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल पूजनानंतर शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावातून दिलासा देण्याची घोषणा करावी, अशी मागणी केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर राज्यातील विविध भागांत विरोधाची भूमिका अधिक तीव्र होत असून, सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.