संजय राऊतांचं CM फडणवीसांना खुलं निमंत्रण! 'रामरक्षा' आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन
मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'रामरक्षा' आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, राज्यभर पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दादर येथील राम मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाल्यानंतर आता 18 जुलै रोजी नागपुरातील रामनगर येथील राम मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'रामरक्षा' आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
पत्रात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, "देवेंद्र फडणवीसजी, आपण प्रखर रामभक्त आणि कडवे हिंदुत्ववादी आहात. राम जन्मभूमी आंदोलनात आपण सहभागी झाल्याचा उल्लेख अनेकदा केला आहे. लाखो रामभक्तांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिर उभं राहिलं. मात्र, आता त्याच मंदिरात कथित आर्थिक गैरव्यवहार आणि अपहाराच्या आरोपांमुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 'रामरक्षा' उपक्रम म्हणजे प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या सन्मानासाठी आणि जनजागृतीसाठीचा प्रयत्न आहे."
याच पत्रातून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना 18 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात आयोजित 'रामरक्षा' आंदोलनात उपस्थित राहून रामभक्तांना शुभेच्छा द्याव्यात, अशी आग्रहाची विनंती केली आहे.दरम्यान, या निमंत्रणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आंदोलनाला उपस्थित राहणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




