‘सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र’; राधाकृष्ण विखे पाटलांसह सुप्रिया सुळेंवरही विजय वडेट्टीवारांचा आरोप

‘सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र’; राधाकृष्ण विखे पाटलांसह सुप्रिया सुळेंवरही विजय वडेट्टीवारांचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र असल्याचा आरोप होत आहे. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता, फक्त विखे पाटीलच नाही तर अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र असल्याचा दावा त्यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ओबीसीचं प्रमाणपत्र काढून ठेवलं असल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला. ‘सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे,’ असंही ते म्हणाले. मात्र, शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही, याची आपल्याला माहिती नसल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

विजय वडेट्टीवारांच्या या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हे सर्व ऐकून मला धक्का बसला. माझ्याकडे माझं जन्म प्रमाणपत्र, डिग्रीचं प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र आणि बारामतीच्या खासदार म्हणून मिळालेलं प्रमाणपत्र आहे. माझ्याकडे कोणतंही ओबीसी प्रमाणपत्र नाही,’ असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.तसंच, काँग्रेसकडून दररोज आपल्याला टार्गेट का केलं जात आहे, याचं आश्चर्य वाटत असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. याबाबत महाराष्ट्र काँग्रेसलाच विचारावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आणि मिळालेली प्रमाणपत्रं जात वैधता समितीकडून अवैध ठरवल्याचा आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार असल्याचं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. गरज पडल्यास पुन्हा मुंबईच्या दिशेने मोर्चा वळवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.दुसरीकडे, दक्षिण मुंबईतील आंदोलनांबाबत राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मराठे मुंबईत येणार असल्यामुळेच सरकारने हे नियम लागू केले असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

‘कायदा आणि सत्ता लोकांनी तुमच्या हातात दिली, पण त्याच गोरगरीब मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखलं जात आहे,’ अशी टीका करत जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस आणि शिंदे यांना आपले म्हणून सत्तेवर बसवलं, मात्र तेच मुंबईत येऊ नका म्हणत असतील तर ही सरकारची दादागिरी असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले.