'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद; उद्धव ठाकरेंनी घेतली कानउघाडणी

'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद; उद्धव ठाकरेंनी घेतली कानउघाडणी

मुंबई (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात 'मातोश्री'वर आयोजित बैठकीत मोठा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, कळवा आणि कल्याण मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, कल्याणमधील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आणि दोन गट आमनेसामने आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे उद्धव ठाकरे यांनी बैठकीतच तीव्र नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. पक्षातील अंतर्गत वाद बाजूला ठेवून संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याच निर्णयावरून बैठकीत तीव्र मतभेद उफाळून आल्याचे समजते.

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या घडामोडीनंतर ठाण्यातील अंतर्गत गटबाजीवर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.