'शरद पवारांनी छातीवर हात ठेवून सांगावं, एका वर्गाला तीन वेगवेगळं आरक्षण मिळू शकतं का?'; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव वाढवला असतानाच, त्यांच्या भूमिकेवरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच एका वर्गाला तीन वेगवेगळे आरक्षण मिळू शकते का? असा थेट सवाल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र धमकी देऊन मुंबईला येऊन डिस्टर्ब करतो, असं वक्तव्य करणं आणि जालना व संभाजीनगरमध्ये रास्ता रोको करून जनजीवन विस्कळीत करणं, अशांना सामाजिक जीवनात मान्यता नाही. जरांगे यांच्या मागण्या संविधानाला धरून नाहीत. ते उघडे पडले आहेत आणि आता सावरासावर करत आहेत. ते हौस-मौज आणि व्यक्तिगत गोष्टी करत आहेत. त्यांच्यामुळे मराठा समाजाचा फायदा होत नाही, तर युवकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं त्यांनी म्हटलं.
"पोलिसांना मारहाण झाली असेल, रक्त निघालं असेल तर भारतातील कोणताही कायदा त्या केसेस मागे घेण्याची परवानगी देत नाही. ज्या पद्धतीने अंतरवाली सराटीमध्ये महिला पोलिसांवर हल्ला करण्यात आला, त्याला मुख्य आरोपी का केलं नाही? जरांगेंची मागणी आहे की पोलीस केसेस मागे घ्या. जरांगे, तुला सांगतो, म्हातारा होशील, हातात काठी येईपर्यंत ती मागणी मान्य होणार नाही. तुझे धनी एकनाथ शिंदे ही मागणी मान्य करू शकत नाहीत. युवकांना सांगून त्यांना चुकीच्या मार्गावर आणलं जात आहे. या केसेस मागे घेतल्या जाऊ शकत नाहीत," असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते पुढे म्हणाले की, "दुसरी मागणी 58 लाख नोंदींची आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज असावी. माजी न्यायमूर्ती शिंदे साहेब यांनी तुला विचारलं. तू विखे साहेबांसमोर फोन काढून लावला. तुला माहिती रेतीच्या ठेकेदारांनी दिली आहे. त्यांना काय कळतंय? त्यांना माफ कळतं. आमचे जे संशोधक मराठा भाऊ आहेत, त्यांना विचार. तू कोणाचं ऐकत नाहीस, पण तुझं माकड होत आहे."
"58 लाख नोंदी 1800 सालापासून ते 1967 पर्यंतच्या आहेत. त्या नोंदीत 'कु' आला म्हणजे आरक्षण येत नाही. त्यामध्ये 40 वेगवेगळ्या जाती आहेत. तुला आजपासून लाडाने मन्या म्हणतो. ये मन्या, हे वास्तव सत्य आहे. कोकणात वेगळे कुणबी आहेत. तू नोंदीचा जप करतोस. जात प्रमाणपत्र जबरदस्तीने मिळालं तरी त्याची व्हॅलिडिटी होत नाही. आमच्या शेतीतील माणसाला हे सगळं सांगितलं ना, तरी तो तुला सांगेल की तू चुकत आहेस. ज्या नोंदी सापडल्या आहेत, तीच एक नोंद अनेक वेळा आलेली आहे. जन्माची नोंद, मृत्यूची नोंद, शेतजमिनीची नोंद, सातबाऱ्याची नोंद अशा वेगवेगळ्या नोंदी आहेत," असं त्यांनी सांगितलं.
यावेळी शरद पवारांना सवाल करताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "शरद पवार यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की, एका वर्गाला तीन वेगवेगळी आरक्षणं मिळू शकतात का? एकीकडे EWSचं आरक्षण मागत आहेत, पुढे OBCचं मागत आहेत. मृत झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी द्या, अशी मागणीही केली जात आहे. जर मराठा समाजातील लोकांना नोकरी देत आहात, तर ज्या-ज्या कुटुंबांमध्ये मृत्यू झाले आहेत, त्या-त्या कुटुंबातील व्यक्तींना जात-पात न पाहता नोकरी द्यावी. कुटुंब कोणत्याही जातीचं असलं, तरी नोकरी द्यावी लागेल," असंही त्यांनी म्हटलं.




