वसईच्या पुरात माणुसकीची शर्यत हरली; चादरीच्या स्ट्रेचरवर नेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

वसईच्या पुरात माणुसकीची शर्यत हरली; चादरीच्या स्ट्रेचरवर नेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : वसई-विरारमध्ये पावसाचा जोर आता कमी झाला असला, तरी ७ जुलैच्या अतिवृष्टीने निर्माण केलेल्या भीषण परिस्थितीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. या संकटात माणुसकीचं हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळालं, पण त्याचा शेवट मात्र अत्यंत दुर्दैवी ठरला.

उत्तर प्रदेशातून आलेली २२ वर्षीय कविता दुधनाथ जैस्वाल ही नालासोपारा पूर्वेतील बकरा कंपाउंड, मनीचा पाडा परिसरात पावसाच्या पाण्याने भरलेल्या नाल्यात पडली. परिसरात कमरेएवढं पाणी साचल्यामुळे रुग्णवाहिका किंवा कोणतंही वाहन घटनास्थळी पोहोचू शकत नव्हतं.

अशा वेळी स्थानिक नागरिकांनी चादरीचं तात्पुरतं स्ट्रेचर तयार केलं आणि मुसळधार पाऊस व पाण्यातून वाट काढत कविताला रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी केलेले अथक प्रयत्न अखेर अपुरे ठरले.या घटनेने अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटाची तीव्रता आणि संकटसमयी सामान्य नागरिकांनी दाखवलेली माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

दरम्यान, वसई-विरार परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जनजीवन अद्याप सुरळीत झालेलं नाही. अनेक सोसायट्यांमध्ये अजूनही गुडघाभर ते कंबरेपर्यंत पाणी साचलेलं आहे. वसई पश्चिमेतील अंबाडी रोड परिसरासह अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे.

काही रुग्णालयांमध्येही पाणी शिरल्याने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे. रुग्णवाहिकांना प्रवेश मिळत नसल्याने वैद्यकीय सेवांवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यातच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क अद्याप खंडित असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.