मुंबईतील फेरीवाल्यांना आजपासून QR कोड ओळखपत्रांचे वाटप; 99 हजारांहून अधिक फेरीवाल्यांना दिलासा
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांसाठी महत्त्वाची घडामोड घडली असून आज 10 जून पासून QR कोडयुक्त ओळखपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तब्बल 12 वर्षांपूर्वी झालेल्या फेरीवाला सर्वेक्षणानंतर ही प्रक्रिया प्रत्यक्षात राबवली जात आहे. या ओळखपत्रांमुळे फेरीवाल्यांची ओळख, नोंदणी आणि परवान्याची माहिती एका क्लिकवर तपासता येणार असल्याने प्रशासनाला अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये फरक करणे सोपे होणार आहे.

2014 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 1 लाख 28 हजार 443 अर्ज वितरित करण्यात आले होते. त्यापैकी 99 हजार 435 अर्ज पालिकेकडे दाखल झाले होते. उच्च न्यायालयाने याच सर्वेक्षित फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्रे देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, यापैकी 32 हजार 415 फेरीवाले पात्र ठरले असून सुमारे 29 हजार अर्जदारांची पात्रता पडताळणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
मुंबईत प्रत्यक्षात सुमारे 3.26 लाख फेरीवाले व्यवसाय करत असल्याचा उल्लेख न्यायालयीन नोंदींमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे QR कोड ओळखपत्र मोहिमेमुळे शहरातील अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांची स्पष्ट नोंद ठेवणे शक्य होणार आहे. पुढील काही दिवसांत ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे.
दरम्यान, या निर्णयावरून महायुतीतच मतभेद समोर आले आहेत. काही नेत्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत फेरीवाल्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे म्हटले आहे, तर काहींनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत या प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवला आहे. शिवसेनेने मात्र पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्रे देण्याच्या निर्णयाला ठाम पाठिंबा दर्शवला असून फेरीवाला क्षेत्रे जाहीर करणे आणि टाऊन वेंडिंग समितीची अंमलबजावणी लवकर करण्याची मागणीही प्रशासनाकडे केली आहे.




