स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना रंगरेषांतून मानवंदना ! रौप्यमहोत्सवी चित्रकला स्पर्धेत साडेपाच हजार विद्यार्थ्यांचा उच्चांकी सहभाग
कागल : शाहू उद्योग समूहाचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेत हजारो बालचित्रकारांनी आपल्या कल्पनाशक्तीची सुंदर उधळण करत रंगरेषांतून भावपूर्ण मानवंदना दिली. या स्पर्धेचे हे रौप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष असून, तब्बल साडेपाच हजार (५,५००) विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत यशाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला.

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रणित छत्रपती शाहू कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
चार केंद्रांवर एकाच वेळी स्पर्धेचा उत्साह
ग्रामीण भागातील बालचित्रकारांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा एकाच वेळी चार वेगवेगळ्या केंद्रांवर पार पडली:
· कागल: श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल
· मुरगूड: मुरगूड विद्यालय
· सेनापती कापशी: न्यायमूर्ती रानडे विद्यालय
· कणेरी (ता. करवीर): काडसिद्धेश्वर विद्यालय
७ स्वतंत्र गटांत रंगली स्पर्धा
विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि कौशल्यानुसार स्पर्धेची वर्गवारी खालीलप्रमाणे करण्यात आली होती:
· सामान्य गट: पहिली ते तीसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी, आणि आठवी ते दहावी
· विशेष गट: मूकबधिर (पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी) तसेच मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र गट
या स्पर्धेसाठी प्रा. बबन सावंत, दत्तात्रय चौगुले, मिलिंद देसाई आणि रितेश माने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
"कलेला प्रोत्साहन देणारा वारसा पुढे सुरू"
स्पर्धेदरम्यान बोलताना 'शाहू'चे संचालक युवराज पाटील म्हणाले, "राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला दिलेले प्रोत्साहन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कृतीतून पुढे नेले. कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम सातत्याने सुरू आहे."
तसेच प्रास्ताविक करताना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी सांगीतले की, २००२ पासून सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीला कागलपुरती मर्यादित होती, परंतु वाढत्या प्रतिसादामुळे आज ४ केंद्रांवर साडेपाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात साजरी होत आहे.
कार्यक्रमप्रसंगी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी 'शाहू'चे संचालक सचिन मगदूम, सतीश पाटील, राजे बँकेचे संचालक राघू हजारे, बाबासाहेब मगदूम, प्रवीण कुराडे, नगरसेवक बाळासाहेब माळी, सुशांत कालेकर,शाहू कृषीचे उपाध्यक्ष सुदर्शन मजले,शाहू ग्रुपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रशासन अधिकारी एम. व्ही. वेस्वीकर आदी उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक एस.डी.खोत यांनी मानले.




