दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेस ३ कोटी ६ लाख निव्वळ नफा - अध्यक्षा वर्षा केनवडे

दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेस  ३ कोटी ६ लाख निव्वळ नफा - अध्यक्षा वर्षा केनवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक कोल्हापूर बँकेचा विकासाचा चढता आलेख कायम ठेवत गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवसायात वाढ तसेच यावर्षी सुद्धा तब्बल ३ कोटी ६ लाख इतका विक्रमी नफा बँकेने केला आहे.सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेचे भाग भांडवल २८.०२ कोटी झाले आहे. तसेच बँकेचा स्वनिधी ३७.८४ कोटी झाला आहे.बँकेच्या ठेवीमध्ये २३.९३ कोटीची वाढ होवून एकूण ठेवी ४३८.०९ कोटी इतक्या झाल्या आहेत. बँकेच्या कर्ज वितरणातही वाढ झाली असून २९५.९९ कोटीचे कर्ज वितरण झाले आहे. बँकेचा व्यवसायात वाढ होवून ७३४.०८ कोटीवर एकूण व्यवसाय गेला आहे. निव्वळ एन.पी.ए चे प्रमाण १.७८ टक्क्यावरून १.२२ टक्क्यावर कमी झालेले आहे.अशी माहिती चेअरमन वर्षा केनवडे, व्हा. चेअरमन पद्मजा मेढे यांनी दिली. 

यामध्ये गेले वर्षभर जागतिक, शेअर मार्केटमध्ये ढासळलेली अवस्था, कमी झालेले रेपो रेट, सध्या असलेले अत्यल्प मार्जिन या अडचणींवर मात करून संस्थेने आपली घौडदौड सुरूच ठेवली आहे. बँकेस निव्वळ नफा ३.०६ कोटी झाला असून नफ्यात २०.७३ लाख इतकी वाढ झाली आहे.तरीही "आमची एकच नीती, सभासदांची आर्थिक उन्नती" हे ब्रीद घेवून सत्तेवर आलेले संचालक मंडळ सध्या झालेल्या ३ कोटी ०६ लाखांच्या नफ्यावर समाधानी नसून भविष्यात ४ ते ५ कोटी नफ्याचे उद्दिष्ठ संचालक मंडळासमोर आहे. सभासदांचा बँकेवरील वाढता विश्वास, सुकाणू नेते मंडळी यांचे दिशादर्शक, मार्गदर्शक, सहकारातील सलग डिव्हिडंड मानदंड, सभासदाभिमुख कारभार या सर्वांच्या जोरावर उद्दिष्ठ निश्चित पार होईल. बँकेच्या सभासदांसाठी दि.०१/०१/२०२६ रोजी पासून "सभासद उत्कर्ष कर्ज" ही योजना ९.००% दराने सुरु केली असून सभासदांकडून उत्कर्ष कर्ज योजनेला Se उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

निवडणूक जाहीरनाम्यातील वचननामा पूर्ण करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाची वाटचाल सुरु आहे. पारदर्शक कारभार सुरु असल्याने सभासद बँकेकडे आकर्षित होताना दिसत आहेत. गेल्या ४ वर्षात सभासद आणि संचालक ही दरी पूर्णतः कमी होताना दिसत आहे. प्रत्येक सभासद "माझी बँक" या भावनेने व्यक्त होताना दिसत आहे. हेच बदललेल्या प्रशासनाचे वैशिष्ट ठरत आहे.

शिक्षक बँकेचे सर्व संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध कार्यनीतीने, सुकाणू समिती नेते यांचे मोलाचे मार्गदर्शन, सभासदांचा विश्वास व सेवकांच्या सहकार्याने बँकेला उर्जित अवस्थेत आणले आहे. यावेळी संचालक सर्वश्री अर्जुन पाटील, सुनिल एडके, राजेंद्रकुमार पाटील, बाळासाहेब निंबाळकर, बाळकृष्ण हळदकर, सुरेश कोळी, शिवाजी रोडे-पाटील, शिवाजी बोलके, अमर वरुटे, रामदास झेंडे, एस.व्ही. पाटील, गजानन कांबळे, नंदकुमार वाईंगडे, बाबू परीट, गौतम वर्धन, तज्ञ संचालक बाबुराव कांबळे, अमोल पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम आणि सुकाणू समिती सदस्य उपस्थित होते.