पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! सरपंचासह 6 सदस्य अपात्र; नेमकं कारण काय?
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सहा सदस्य अपात्र ठरले आहेत. ग्रामपंचायतीचा कर विहित मुदतीत न भरल्याने अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. मात्र, ही कारवाई भाजपने षडयंत्र रचून केल्याचा आरोप अपात्र सदस्यांनी केला आहे.

अपात्रतेपूर्वी भाजे ग्रामपंचायतीत सरपंचासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सात, तर भाजपचे तीन सदस्य होते. आता सरपंचासह राष्ट्रवादीचे पाच सदस्य अपात्र झाल्याने भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य असं समीकरण उरलं आहे. त्यामुळे भाजे ग्रामपंचायतीची सत्ता आता कोणाच्या हातात जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजे ग्रामपंचायतीत एकूण नऊ ग्रामसदस्य आणि एक सरपंच अशी रचना आहे. ग्रामपंचायत कराची थकबाकी वेळेत न भरल्याच्या प्रकरणात सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी, विकास बबन वाल्हेकर, प्रमोद विजय डगळे, सारिका विश्वनाथ पदमुळे आणि कविता अशोक चौरे या सहा जणांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. प्रताप कैलास गरवड आणि शेखर चंद्रकांत दळवी यांनी याबाबत विवाद अर्ज दाखल केला होता. त्यावरील सुनावणीनंतर अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी अपात्रतेचा निर्णय दिला.
दरम्यान, या आदेशाविरोधात अपात्र सदस्यांना अपील करता येणार आहे. अपीलनंतर स्टे मिळाल्यास सुनावणी पूर्ण होईपर्यंत हे सदस्य पदावर राहू शकतात. मात्र अपील न केल्यास किंवा स्टे न मिळाल्यास ग्रामपंचायतीतील सत्तेचं समीकरण बदलणार आहे. सध्या बहुमताचं समीकरण बदलल्याने प्रशासक नेमण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोटनिवडणूक होऊ शकते आणि मतदारांचा कौल ज्याच्या बाजूने असेल, त्यानुसार भाजे ग्रामपंचायतीची सत्ता निश्चित होणार आहे.




