टीव्हीसमोर बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या; मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो, जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन
मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. सरकारने त्यांच्या 12 मागण्या मान्य केल्या असल्या तरी वंशावळ आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे दिल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण न झाल्याने जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. यापूर्वीच त्यांनी मुंबईकडे जाण्याचा इशारा दिला होता. 12 सप्टेंबरपर्यंतची दिलेली मुदतही आता संपली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा बांधवांना उद्या अंतरवालीत येण्याचं आवाहन केलं आहे.

उद्या 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता गरजवंत मराठा समाजाच्या लेकराबाळांसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शक्यतो प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहा. आता अटीतटीचा सामना आहे, घरी बसून टीव्हीवर बैठक पाहण्याचे दिवस नाहीत, असं म्हणत त्यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवालीत येण्याचं आवाहन केलं. समाजाच्या लेकरांची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहावं, असं जरांगे पाटील म्हणाले.
ज्यांना अंतरवालीत येणं शक्य नाही, त्यांनी आपल्या समाजासाठी एक दिवस द्यावा. मुंबईचा मार्ग ज्या ठिकाणांहून जाणार आहे, तिथे हातातील कामं सोडून रस्त्यावर यावं आणि आशीर्वाद द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. उद्या मुंबईचा मार्ग निश्चित केला जाईल. ज्या ठिकाणी मुक्काम असेल, त्या परिसरातील बांधवांनी जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था करावी, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.
पाऊस आणि इतर अडचणी लक्षात घेता महिलांनी येऊ नये, गाव सांभाळलं तरी खूप झालं, असं त्यांनी म्हटलं. आरक्षणासोबतच शेतीचंही संकट आहे. सर्व गावकऱ्यांनी वर्गणी करून गाड्यांची व्यवस्था करावी, असं आवाहन त्यांनी केलं."एका तालुक्यात आपण लाखापेक्षा कमी नाहीत. सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही," असं म्हणत जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार व्यक्त केला.
ज्यादिवशी तारीख ठरेल, त्यादिवशी कामं सोडून रस्त्यावर या. मुंबईत आम्हाला त्रास झाला तर जागोजागी रस्ते अडवून ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.
मागच्या वेळी परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी परवानगी दिली किंवा नाही दिली, तरी मुंबईला जाणार, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. न्यायदेवता गोरगरिबांच्या लेकरांवर अन्याय करत नाही, असंही त्यांनी म्हटलं.




