रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावलेंचे संकेत; "लवकरच अधिकृत घोषणा"
रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. मंत्री भरत गोगावले यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत देत, सर्व काही निश्चित झाले असून आता केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.

माणगाव येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना गोगावले म्हणाले,रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ पातळीवर सर्व निर्णय झाला आहे. सर्व काही ठरलेले असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.
दरम्यान, माणगावमध्ये मनसेला मोठा धक्का बसल्याचा दावाही त्यांनी केला. शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे रायगडमध्ये पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमच्यासोबत यावे. आगामी काळातही पक्षप्रवेशाचा सिलसिला कायम राहील, असा दावाही भरत गोगावले यांनी केला.




