नाशिक TCS प्रकरणाला नवे वळण; 'गुगल सर्च'चा पुरावा कोर्टात, SITचा मोठा खुलासा
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील तरुणीवरील कथित अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपांच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने, म्हणजेच एसआयटीने, न्यायालयात महत्त्वाचे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे. तपासादरम्यान संशयितांनी पीडितेचे नाव बदलण्यासाठी वर्षभर आधीच इंटरनेटवर 'हानिया' या नावाचा शोध घेतल्याची माहिती एसआयटीने न्यायालयात मांडली.

एसआयटीच्या म्हणण्यानुसार, पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन तिचे बेकायदेशीरपणे नामांतर करण्यात आले. तसेच बदललेल्या नावाने नऊ हजार रुपयांची जकात भरल्याचेही तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.या प्रकरणात दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून, तपासादरम्यान आणखी काही जणांना सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपी निदा खानच्या वैद्यकीय तपासणीचा अर्ज मंजूर केला असून कारागृह प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले आहेत. या प्रकरणात एसआयटीने तब्बल १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.




