केतन अग्रवाल प्रकरणात SIT चा तपास वेगात; सियासह इतरांचीही चौकशी

केतन अग्रवाल प्रकरणात SIT चा तपास वेगात; सियासह इतरांचीही चौकशी

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवे दावे समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेकडे आता पोलिस कथित खुनाच्या दृष्टीने पाहत आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधीच संपूर्ण कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या सर्व दाव्यांना बचाव पक्षाने न्यायालयात आव्हान दिले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर घडलेल्या घटनेच्या आदल्या दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी एका कॅफेमध्ये भेटून कथितपणे संपूर्ण योजना आखली होती. तसेच, यापूर्वी त्यांनी लोहगडावर जाऊन जागेची पाहणी आणि कथित रिहर्सल केल्याचाही पोलिसांचा दावा आहे.तपासात असेही समोर आल्याचे पोलिस सांगतात की, किल्ल्यावर चढताना सियाने पाणी पिण्याचा किंवा बुटाची लेस बांधण्याचा बहाणा करत खाली बसून चेतनला इशारा केला. त्यानंतर चेतनने केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या हालचालीमागे केतनने स्वतःचा बचाव करताना सियाला पकडू नये, असा हेतू असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चेतन चौधरीने ओळख लपवण्यासाठी दुचाकीचा वापर केला आणि किल्ल्यावर जाताना तसेच परतताना हुडी घातली होती. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, केतन दरीत पडल्यानंतर सियाने तत्काळ मदतीसाठी आरडाओरडा केला नाही. काही वेळ शांत राहिल्यानंतर तिने सर्वप्रथम आपल्या आईला फोन केला आणि त्यानंतर जवळपास १५ मिनिटे नातेवाईकांशी संवाद साधला. त्यामुळे केतनला वेळेत मदत मिळाली नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून सियाच्या दोन जवळच्या मैत्रिणींसह मित्तल कुटुंबातील काही सदस्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. या चौकशीतून आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.दुसरीकडे, सिया गोयलच्या वकिलांनी पोलिसांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस कोठडीत दिलेला जबाब न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही, असे सांगत सुरुवातीला ही घटना अपघात मानली गेली आणि नंतर खुनाचा गुन्हा कसा दाखल झाला, हा मुद्दा न्यायालयात मांडला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.