मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, महायुतीत महापौरपदावरून नव्या चर्चांना उधाण

मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, महायुतीत महापौरपदावरून नव्या चर्चांना उधाण

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर आता महापौरपदाच्या कार्यकाळावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठरल्यानुसार पहिले अडीच वर्षे भाजपचा महापौर पदावर विराजमान झाला असला, तरी उर्वरित अडीच वर्षांतील सुरुवातीची सव्वा वर्षे शिवसेनेचा महापौर असेल, असा दावा उपमुख्यमंत्री आणि मुंबई शहर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गुरुवारी (२७ ऑगस्ट) 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

 

एकनाथ शिंदे म्हणाले की, "महायुतीच्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेला सव्वा वर्षासाठी महापौरपद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिवसेनेच्या कार्यकाळानंतर पुन्हा सव्वा वर्षासाठी भाजपचा महापौर असेल." शिंदेंच्या या दाव्यामुळे पालिकेच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिवसेनेने आता महापौरपदाचा चेंडू भाजपच्या कोर्टात टाकला आहे. मात्र, यावर अद्याप भाजप नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

महापौर रितू तावडे यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह?
महायुतीची सत्ता आल्यावर भाजप-शिवसेनेच्या संमतीने भाजप नगरसेविका रितू तावडे यांची अडीच वर्षांसाठी महापौरपदी निवड झाली होती. मात्र, तावडे यांचा कार्यकाळ वादातीत राहिला आहे. नुकत्याच दादर येथील 'वसंत स्मृती' कार्यालयात झालेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर आले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप रितू तावडे यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू देणार की त्यापूर्वीच महापौर बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 'नंदनवन' येथील या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, पालिकेतील शिवसेना गटनेते अमेय घोले, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि 'बेस्ट' समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव आदी प्रमुख नेते उपस्थित होते.