'मी जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही...'; मनोज जरांगे यांच्या जहाल वक्तव्याने राजकारणात खळबळ
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून अत्यंत संतप्त झाले आहेत. सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून, सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूरनंतर ते आता सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला असून, त्यांच्या एका जहाल वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बावनकुळेंमुळे प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप
कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याने मराठा समाजात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानेच ही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. बावनकुळे यांच्या एका चुकीमुळे संपूर्ण मराठा समाज चिडला असून, हे मंत्रीच बोगस आहेत, असे ते म्हणाले. या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील अडचणीत आले असून, प्रमाणपत्रे नेमकी का रद्द केलीत, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
"मी जीवघेणं उपोषण करू शकतो, तर जीवही..."
सभेदरम्यान बोलताना जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले. सरकार आपला घात करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. "धाराशिवपासून माझा रोड बंदोबस्त काढण्यात आला. माझ्यावर हल्ला व्हावा, दगडफेक व्हावी आणि हाणामारी व्हावी, असा सत्ताधाऱ्यांचा डाव होता," असे ते म्हणाले. तसेच, "मी जर जीवघेणं उपोषण करू शकतो, तर प्रसंगी जीवही घेऊ शकतो; पण सूड घेतल्याशिवाय आणि या सरकारला सोडणार नाही," असा जहाल इशारा त्यांनी दिला. बहुमतामुळे सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली असून त्यांचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही, असे ते स्पष्टपणे म्हणाले. या सरकारमधील मंत्र्यांना स्वतःची भाकर खाण्याचेही स्वातंत्र्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
सांगली जिल्ह्यात चार जाहीर सभांचे आयोजन
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली असून, सांगली जिल्ह्यात त्यांच्या चार महत्त्वाच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
· आज सायंकाळी आटपाडी येथे त्यांची पहिली जाहीर सभा पार पडेल.
· उद्या सकाळी कवठेमंकाळ तालुक्यात त्यांचा दौरा असून सकाळी १० वाजता सभा होईल.
· दुपारी ३ वाजता वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे मराठा समाजाच्या वतीने जाहीर सभा होईल.
· त्यानंतर कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे सायंकाळी त्यांच्या दौरा आणि सभेची सांगता होईल.




