मासा पाण्यातील वनस्पती म्हणून प्रसादाच्या नावाखाली खाऊ घातलं, श्रद्धेचा घेतला गैरफायदा
मुंबई (प्रतिनिधी) : भोंदू अशोक खरात याच्या फसवणुकीचे नवे प्रकार तपासात समोर येत असून, लोकांना धार्मिक आणि भावनिक पातळीवर गंडा घालण्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. विशेषतः शाकाहारी नागरिकांना दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरात हा शाकाहारी व्यक्तींना “मासा हा पाण्यातील वनस्पती आहे” असे सांगून त्यांना प्रसादाच्या नावाखाली मासे खाण्यास भाग पाडत होता. काही जैन धर्मीय व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. “मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडे नसतात,” अशा खोट्या दाव्यांद्वारे त्याने लोकांची दिशाभूल केली आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचे दिसून येत आहे.

या प्रकारातून अनेकांकडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात उघड होत आहे. धार्मिक श्रद्धा, अंधविश्वास आणि अज्ञान यांचा फायदा घेत खरातने अनेकांना लुबाडले आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत अशोक खरातच्या या बनवेगिरीचे अनेक पैलू उघडकीस येत असून, त्याच्या विरोधात आणखी गंभीर गुन्हे नोंदवले जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
आज अशोक खरातला न्यायलयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी खरातला न्यायलयाला कोठडी देण्यात आली आहे. उद्या पुन्हा एकदा खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे. अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, उद्या २ एप्रिलला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.




