‘चाकरमानी’ हा शब्द होणार इतिहासात जमा ; आता 'या' नावाने कोकणवासियांना हाक मारा
मुंबई - गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर कोकणवासीयांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायी बातमी पुढे आली आहे. कोकणातून नोकरी, व्यवसाय अथवा अन्य कामानिमित्त मुंबईसह विविध शहरांमध्ये स्थलांतर केलेल्या लोकांना अनेक वर्षांपासून 'चाकरमानी' या नावाने संबोधले जात होते. मात्र, हा शब्द अपमानास्पद असल्याची भावना अनेक कोकणवासीय संघटनांनी व्यक्त केली असून, राज्य सरकारने आता त्यावर सकारात्मक पाऊल उचलले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, यापुढे सरकारी कागदपत्रे आणि शासकीय संवादामध्ये ‘चाकरमानी’ हा शब्द वापरला जाणार नाही. त्याऐवजी ‘कोकणवासीय’ हा सन्मानसूचक शब्द वापरण्यात यावा, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत. लवकरच याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात येणार असून, शक्य असल्यास गणेशोत्सवाच्या आधीच ते प्रसिद्ध करण्यात येईल.

मुंबई - गोवा महामार्गासंदर्भातील एका बैठकीत रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. या बैठकीदरम्यान कोकणवासीय संघटनांनी ‘चाकरमानी’ या संज्ञेवर आक्षेप नोंदवला. त्यांच्या मते, ‘चाकर’ (सेवक) आणि ‘मानी’ (मानणारा) यांपासून बनलेल्या या शब्दात कमीपणा जाणवतो, जो कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला धक्का देणारा आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या कोकणातील जिल्ह्यांतून लाखो नागरिक वर्षानुवर्षे मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये नोकरी वा व्यवसायासाठी स्थलांतरित झाले आहेत. हे नागरिक गणेशोत्सव, दिवाळी, शिमगा यांसारख्या सणांवेळी मोठ्या संख्येने गावाकडे परततात. याच पार्श्वभूमीवर ‘चाकरमानी’ या संज्ञेचा वापर रूढ झाला होता.
मात्र, आता महायुती सरकारने या शब्दप्रयोगाला बदल देत कोकणवासीयांच्या स्वाभिमानाला मान्यता दिली आहे. त्यांच्या संस्कृतीची आणि ओळखीची प्रतिष्ठा जपण्यासाठी ‘कोकणवासीय’ हा शब्द अधिक योग्य असल्याचे मान्य करत हा बदल करण्यात येत आहे. हा निर्णय कोकणवासीयांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देणारा असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम अधिक सकारात्मक जाणवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




